आईचं थांबलेलं जग आणि मुलाचं धावणारं आयुष्य
आई माझी टक लावून वाट पाहात असते.
प्रश्न पोटापाण्याचा म्हणून मी बाहेर असतो.
आहे ती शेती — तुटपुंजं उत्पन्न;
म्हणूनच मी गावाबाहेर असतो.
मन मात्र अडकलेलं असतं गावात,
पण पोट स्वस्थ बसू देत नाही.
माझं पोट भरलं पाहिजे,
तसंच माझ्या घरच्यांचंही.
आणि उद्या माझी पाखरं
भरारी घेतील — ही एकच आशा.
म्हणून मी बाहेर असतो.
आठवडा सरतो धावपळीत…
एक दिवस येतो सुटीचा,
आणि पावलं आपोआप वळतात गावाकडे.
क्षणभराची भेट…
परतताना पावलं जड होतात.
पण शेवटी प्रश्न पोटापाण्याचाच —
म्हणून ती जड पावलंही उचलावी लागतात.
आणि त्या क्षणभराच्या भेटीसाठी,
आई माझी पुन्हा
टक लावून वाट पाहात असते.

Comments
Post a Comment