एकतर्फी निष्ठा
मैत्रीतून झालेली सुरुवात
हळूहळू प्रेमात रूपांतरित झाली.
क्षणकालीन मैत्री,
आणि दीर्घकाळ मनात रुतून बसलेलं प्रेम.
पण दोघांचे मार्ग
आधीच वेगळे ठरलेले होते.
ती सोडून गेली…
संसार थाटला,
नवरा आणि मुलगा यात रमून गेली.
काळ पुढे सरकला,
आणि मग तिला आठवलं
ते जुने प्रेम.
तिला ते प्रेम म्हणून स्वीकारणं शक्य नव्हतं,
पण त्याला गमवायचंही नव्हतं.
त्याच्याबद्दल
एक अगतिक ओढ होती.
म्हणून ती म्हणू लागली—
“मित्र बनून तरी रहा.”
पण त्याच्या मनात
तेवढंच प्रेम होतं,
जितकं सुरुवातीला होतं.
त्याचाही संसार होता,
बायको होती, लेकरं होती…
पण तिचं प्रेम
त्याने जपून ठेवलं होतं.
तिची जागा
अजूनही तिचीच होती.
तो व्यक्त होत होता,
ती अव्यक्त राहात होती.
त्याला ती हवी होती
बरसणाऱ्या सरींसारखी…
आणि तिला तो हवा होता
गारवा देणाऱ्या सावलीसारखा.
पण सावली पकडता येत नाही—
ती अंधारात हरवते.
त्याला तेच नको होतं.
त्याच्या मनात तिचं जे अढळ स्थान होतं,
तेच स्थान
तिच्या मनातही असावं
अशी त्याची इच्छा होती.
पण काळ सरत गेला…
आणि तो हरत गेला.
तिची ओंजळ
त्याच्या प्रेमाने भरलेली होती,
आणि त्याची मात्र
रितीच राहिलेली होती.

Comments
Post a Comment