ही गोष्ट म्हणजेच – ‘एक छोटा राग, थोडं मौन, आणि मग त्यात मिसळलेलं गोड प्रेम. 💕
“Hello… मग केली का तुझी नाराजी दूर त्याने?” मी विचारलं.
ती हसतच म्हणाली –
“हो केली ना…”
“हो काय… कशी काय, रोमँटिक मूडमध्ये?” मी थोडं चिडवतच विचारलं.
ती मग शांतपणे सांगायला लागली –
“घरी आले तेव्हा मी कपड्यांच्या घड्या करत होते. बेडवर बसून.
ते आले आणि माझ्या शेजारी आडवे झाले.
हसत म्हणाले – ‘एक ग्लास पाणी आणतेस का? खूप तहान लागलीये.’
मी उठून पाणी आणायला गेले.
परत आले तर काय बघते…
सगळी कपड्यांची घडी मोडून ठेवलेली!
क्षणभर मनात आलं की आता ओरडतेच, पण नाही… काहीच बोलले नाही.
शांतपणे कपडे उचलले, दुसऱ्या खोलीत नेऊन घडी घालायला लागले.
ते परत आले आणि म्हणाले –
‘गुड्डू, मस्त चहा प्यायची इच्छा आहे ग… मीच करतो चहा, पिशील का माझ्या हातचा?’
मी काहीच बोलले नाही.
ते फ्रेश झाले, स्वतःहून चहा केला.
दोन कप घेऊन आले.
‘गुड्डू, चहा जरा जास्तच झाला… पिशील ना? नाहीतर वाया जाईल.
वाया गेलं की तुला आवडत नाही ना…’
ते हळूच समोर कप ठेवत म्हणाले –
‘आग, थंड होईल आधी घे.’
मी हातात कप घेतला आणि चहा प्यायला सुरुवात केली.
तेव्हा त्यांनी स्वयमला हाक मारली.
स्वयम आला आणि म्हणाला –
‘आई माझ्याशी कटी आहे… तिला सांग ना गट्टी करायला!’
श्रीने हसत माझ्या डोक्यावर हात मारला.
पण मी मुद्दाम गंभीर चेहरा केला होता.
तेवढ्यात श्री गंभीरपणे मला सांगायला लागले – ‘आज काय घडलं…’
मी मात्र जाणीवपूर्वक एकही प्रतिसाद दिला नाही.
मी उठून हॉलमध्ये गेले.
ते पण माझ्या मागे आले, हातात कप घेऊन.
मी चहा झालेला कप सिंकमध्ये ठेवला.
ते लगेच म्हणाले –
‘नको नको, थांब… मीच करतो. चहा मी केला तर भांडी पण मीच धुवतो.’
मी काहीच बोलले नाही.
मी फ्रेश व्हायला गेले.
तोपर्यंत दिवा लावायची वेळ झाली होती.
मी दिवा लावला आणि स्वयमला बोलावलं “शुभं करोती” म्हणायला.
स्वयम आला, आणि श्री पण आमच्या बरोबर म्हणाले.
नंतर मी रॉकिंग चेअरवर बसले.
स्वयम माझ्या मांडीवर येऊन बसला.
श्रीने चिडवत म्हटलं –
‘आज इतक्या लवकर आलो तरी बोलत नाहीस… नेहमी तर उशिरा आल्यावर ओरडतेस. आता आलं तर गप्प! असं का करतेस तू? मी एकटा आणि तू व स्वयम एक टीम!’
स्वयम हसून म्हणाला –
‘पप्पा, एवढंच आहे तर सॉरी म्हणा ना आईला!’
मी हसू दाबत होते.
स्वयम म्हणाला – ‘आणि आईला एक पप्पी द्या! माझ्यावर रुसली तर मी तसंच करतो. सॉरी म्हणतो आणि पप्पी देतो.’
श्रीने हसत स्वयमकडे पाहिलं.
‘इतकं सोपं आहे का रे?’
स्वयम म्हणाला –
‘हो पप्पा! द्या ना आता… जा माझ्याद्वारे आईला पप्पी द्या.’
बेचारा स्वयम माझ्याकडे आला आणि पप्पी दिली.
मी तरीही हसले नाही, बोलले नाही.
श्री म्हणाले –
‘हे बघ, तरी पण नाही बोलत… आता काय करू?’
स्वयम खोडकरपणे म्हणाला –
‘पप्पा, तुम्हीच द्या ना थेट पप्पी! माझ्या हातून का घ्यायचं?’
श्री थोडेसे हसले आणि थेट माझ्या समोर आले.
माझे दोन्ही गाल हातात धरून म्हणाले –
‘सॉरी ग…’
मी डोळ्यातून सरळ त्यांच्याकडे पाहत होते.
मनातली रुसवा-फुगवा संपला होता.
त्यांनी पटकन एक पप्पी पण घेतली.
स्वयम समोर उभा राहून पहात होता – ‘आई हसते की नाही?’
मी शेवटी हसलेच…
आणि माझं हसू पाहताच सगळा राग कुठे विरून गेला.
स्वयम लगेच म्हणाला –
‘पप्पा, झालं ना आता?’
श्रीने स्वयमला मिठी मारत म्हटलं –
‘बरं झालं बाप्पा तू आहेस… नाहीतर ३–४ दिवस ही फुगून बसली असती.’
स्वयम खट्याळपणे म्हणाला –
‘आई काही फुगा आहे का? जो फुगून बसेल!’ 😂
तेव्हा आम्हा तिघांना जोरात हसू आलं.
आणि श्री म्हणाले –
‘आजपासून आईला कधीच त्रास नाही द्यायचा.
चल, बाहेरच जेवायला जाऊ या तिघं मिळून!’
आणि मग आम्ही तिघांनी एकत्र, हसत-खेळत रेस्टॉरंटला जाऊन रात्रीचा दिवस गोड करून टाकला.

Comments
Post a Comment