मसानवट्यावरून आलेली पालखी – एका लहानग्याची आठवण

 

✍️ लेखन: गजानन रा. माने, अप्पाचीवाडी (मो. ९४०३४५३८५३)

ही कथा साधारणपणे माझ्या लहानपणीची, म्हणजे २० वर्षांपूर्वीची आहे. मी तेव्हा दहा-अकरा वर्षांचा होतो. त्या दिवसांत शेतात जोंधळ्याची कापणी आणि शेंगा सोलण्याचं काम सुरू होतं. आमच्या शेतात खळ्यावर शेंगा वाळत घातलेल्या, आणि जोंधळ्याची कणसं खुडली जात होती.

शेतीचं काम चालू असताना अण्णा नेहमीप्रमाणे रात्री शेतावरच थांबले होते. त्यांच्या रात्रीच्या जेवणाची जबाबदारी मात्र माझ्यावर आली. पण माझं मन धस्स झालं… कारण त्या वाटेत मध्येच मसानवटा लागतो, आणि गावात एक ऐकीव गोष्ट पसरली होती – रात्री नऊ ते बारा दरम्यान त्या वाटेवरून "भुतांची पालखी" जाते!

ते दिवसच असे होते – घरात वीज नव्हती, बॅटरी नव्हती, कंदीलही नव्हता. आई शेतावरून येते तेव्हा आठ-साडेआठ वाजायचे, मगच जेवण तयार व्हायचं. जेवण तयार व्हायला उशीर झाला, आणि मला शेतात जेवण घेऊन निघायचं होतं, तेव्हा साधारण नऊ-सव्वा नऊ वाजले होते.

आईने डोक्यावर गाठोडं दिलं, आणि मी मनाचा हिय्या करून घराबाहेर पडलो.

जसा गावाच्या वेशीबाहेर पडलो, तसा अंधार घनदाट झाला. अमावस्या होती, त्यामुळे चंद्राचा लवलेशही नव्हता. सगळीकडे भयाण शांतता. फक्त अधूनमधून एखाद्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज. मी मनातून "राम राम" म्हणत वाटचाल करत होतो. अंगाला घाम फुटला होता, पण पावलं थांबत नव्हती.

अचानक दूरवर चितेचा उजेड दिसला…
कळलं की आज जैन काकांचे आजोबा गेले, आणि त्यांचं प्रेत मसानवट्यावर जळतंय. अंधारात चितेचा तेजस्वी प्रकाश वाटेवर पडला होता. आधीच भूतांच्या कल्पनेने गांगरलेलं मन, आता तर पूर्ण गारठून गेलं.

तेव्हाच एका क्षणी जोराचा "फटका" फुटल्यासारखा आवाज झाला!

काय झालं हे कळायच्या आत, मी जोरात पळालो… डोक्यावरचं जेवणाचं गाठोडं सांभाळत, एकामागून एक देवांची नावं घेत पळू लागलो. पावलं थांबायला तयार नव्हती.

असंच धावत असताना वाटेत एक भलं मोठं चिंचेचं झाड आलं. त्याच झाडावरून काहीतरी झपाट्याने उडालं… मोठा आवाज झाला. माझ्या काळजात धडकी भरली. मी आता पळतच नाही, ओरडत पळत होतो!

शेवटी शेताच्या जवळ आलो, आणि माझा आवाज ऐकून अण्णा धावत आले. त्यांनी मला जवळ घेतलं, मिठी मारली. तेवढीशी एक मिठी – आणि भीती कुठल्या कुठे पळून गेली.

"काय झालं रे एवढं?" त्यांनी विचारलं.

सगळा प्रकार मी धडधडत्या आवाजात सांगितला. ते हसले.
"अरे बाबा, त्या चितेवरून जळताना कवटी फुटते तेव्हा असा आवाज येतो… आणि त्या चिंचेच्या झाडावर जी वटवाघुळे बसलेली असतात, ती तुझ्या धावण्याच्या आवाजाने उडाली असतील."

"भूत वगैरे काही नसतं रे… भीती फक्त आपल्या मनात असते." त्यांनी मोठ्या प्रेमाने सांगितलं.

त्या दिवशी मला एक आयुष्यभर पुरणारा धडा मिळाला –
भीती पळवायची असेल, तर फक्त विश्वास आणि धैर्याची सावली पुरेशी असते.

Comments